जनगणना कार्यासाठी शिक्षकांची नियुक्ती ; आजपासून प्रशिक्षणास सुरुवात

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील आगामी जनगणना प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. 

या जनगणना मोहिमेसाठी एकूण ५५५ प्रगणक आणि ९३पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गरज भासल्यास तात्काळ वापरासाठी ५५ राखीव प्रगणक आणि १० राखीव पर्यवेक्षक सज्ज ठेवण्यात आले आहेत.

प्रत्येक प्रगणकाला अंदाजे १५० ते २०० कुटुंबांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक सहा प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक कार्यरत राहून संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी जिल्हा परिषद शिक्षक संस्थेतील शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे कार्य अधिक शिस्तबद्ध व प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी २५ एप्रिलपासून प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात होणार असून, जनगणना प्रक्रिया अचूक आणि सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे. 

या संपूर्ण जनगणना कार्यावर तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार कृष्णा मसरुप, अव्वल कारकून अखिल पठाण, तसेच केंद्रप्रमुख तथा जनगणना प्रशिक्षण प्रमुख मनोज कुमार सरग आणि सहाय्यक प्रशिक्षण प्रमुख रेवणनाथ खेडकर आदी अधिकारी तहसील स्तरावरून बारकाईने लक्ष ठेवून कामकाज पाहत आहेत.

जनगणना ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी असल्याने शिक्षक वर्ग पूर्ण क्षमतेने व जबाबदारीने हे कार्य पार पाडेल, गंभीर आजारी, दिव्यांग, गरोदर महिला आदी शिक्षकांना या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी प्रशासनास करण्यात आली आहे.
- अमोल एरंडे, जिल्हाप्रमुख, महाराष्ट्र राज्य शिक्षक व
शिक्षकेत्तर सेना छत्रपती संभाजीनगर